Wednesday, March 6, 2019

आपण यांच्यावर बहिष्कार कधी टाकणार?

पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असताना एनडीटीव्ही(NDTV) च्या एका महिला पत्रकाराने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. या महिला पत्रकाराने व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवणारी संतापजनक पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार समोर येताच एनडीटीव्हीने याची दखल घेत संबंधित महिला पत्रकाराला फक्त दोन आठवड्यांसाठी निलंबत केलं आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र या हल्ल्याचा निषेध होत असाताना एनडीटीव्हीच्या वरिष्ठ महिला संपादक निधी सेठी हिने आपल्या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवली. ’56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले अशा आशयाचं ट्विट करत सेठी हिने #HowsTheJaish असा हॅशटॅगही वापरला. दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारा हॅशटॅग म्हणून #HowsTheJaish या हॅशटॅगकडे पाहिलं जातं.

तीची पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला चांगलंच धारेवर धरलं. नेटकऱ्यांनी निधी सेठी हिला तीच्या वादग्रस्त पोस्टचा जाब विचारत चांगलेच झापले. मोठ्या प्रमाणात निधी सेठी हिला ट्रोल करण्यात आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एनडीटीव्हीने कारवाई करत निधी सेठी हिला दोन आठवड्यांसाठी निलंबित केलं.

भारतत राहून, या देशाचं खाऊन, इथल्या पैश्यावर मौजमजा मारून असा देशविघातक विषारी विचार यांच्या नसानसात भरला आहे त्या नालायक पत्रकारांचा आणि त्याना पाठीशी घालणार्‍या NDTV सारख्या प्रसारमाध्यमांचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि समस्त भारतीयांनी त्यांच्यावर निदान बहिष्कार तरी घातला पाहिजे.

श्रद्धांजलीसाठी एकजुट नको, टुकडे टुकडे गर्जणार्‍यांच्या व त्याच्या समर्थकांच्या विरोधात एकजुट होता आले तर बघा.


ही घटना राजकीय लाभासाठी वापरणार नाही असे कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वच्छ सांगून टाकलेले होते. पण त्यांच्याच पक्षाचे पंजाबातील एक मंत्री नवज्योत सिद्धू यांनी तात्काळ प्रतिक्रीया देताना निषेध वा बदल्याची बाब बाजूला ठेवून पाकिस्तानशी संवाद करूनच संघर्ष रोखता येईल, अशी मुक्ताफ़ळे उधळलेली आहेत. दुसरीकडे राहुलच्याच सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख दिव्य स्पंदना यांनी अगत्याने त्याच राष्ट्रीय भावनांना पायदळी तुडवित प्रशांत भूषण यांच्या सिद्धूसारख्याच प्रतिक्रीया सोशल मीडियाच्या कॉग्रेस खात्यावर पुनर्मुद्रीत केल्या होत्या. हा कश्मिरी तरूणाने केलेला हल्ला आहे आणि काश्मिरातील तरूण अशाप्रकारे दहशतवादाकडे वळत असल्याला भारत सरकारचे धोरण व तिथली लष्करी कारवाईच जबाबदार असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केलेला आहे. त्यांनी काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावे, असी सुचना यापुर्वी अनेकदा मांडलेली आहे आणि अशा जिहादी दहशतवादी घातपातानंतर त्यातल्या संशयितांना वाचवण्यासाठी भूषण यांच्यासारखे वकील नेहमीच पुढे आलेले आहेत. अशाचप्रकारे भारतीय संसद भवनावरच्या हल्ल्यात अफ़जल गुरू दोषी ठरलेला असताना त्याच्याही समर्थनाला भूषण व तत्सम अनेकजण समोर आलेले आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या फ़ाशीचा निषेध करणार्‍या सोहळ्यात या लोकांनी वारंवार सहभाग घेतलेला आहे. अशा एका सोहळ्याचे आयोजन नेहरू विद्यापीठात झाले, तेव्हा अफ़जल गुरूचे समर्थन व भारताचे तुकडे करण्याच्या डरकाळ्या फ़ोडल्या गेल्यावर काहूर माजले. तर घोषणा देणार्‍यांच्या समर्थनाला राहुल गांधींसह केजरीवालही जाऊन पोहोचले होते.

आपल्या जागी आपले काम वा कर्तव्यही ज्यांना धड बजावता येत नाही, हे लोक आज शिरजोर झालेत. ही आपल्याला घातपातापेक्षाही अधिक भेडसावणारी समस्या झालेली आहे. गुप्तचर खाते झोपलेले होते काय? असलेही सवाल सरकारला हे विचारत असतात. बंगालमध्ये सीबीआयला आपली कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अधिकार्‍यांना अटक करण्यापर्यंत मजल मारणार्‍या ममता आता त्याच थाटात गुप्तचर व सुरक्षा सल्लागार काय करीत होते; असा सवाल करीत आहेत. मात्र आपल्या हाती जो अधिकार वा स्वातंत्र्य आलेले आहे, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे सौजन्यही त्यांच्यापाशी कधी आढळून येत नाही. आपल्या कर्तव्यात लहानसहान बाबतीत कसुर करणारेच; सरकार, गुप्तचर, सुरक्षा दलांना नित्यनेमाने सवाल विचारू लागतात, तेव्हा आधीच जीव धोक्यात घालून राखण करणार्‍यांचे लक्ष किती विचलीत होत असेल? त्यांचे विचलीत लक्ष वा गोंधळलेपणा पाकिस्तानच्या दहशतवादी संस्था संघटनांसाठी सर्वात मोठी मदत असते. चकमकीत गुंतलेल्या लष्कराच्या जवानांना मागून धोंडे मारून विचलीत करणारे हुर्रीयतचे भाडोत्री निदर्शक आणि उठल्यासुटल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नांचा भडीमार करणार्‍यांमध्ये नेमका कोणता गुणात्मक फ़रक असतो? (ही सुरक्षा दळांवर केलेली वैचारीक दगडफेक नव्हे का?)  पाकिस्तान कुणा कश्मिरी वा भारतीय बहकल्या मुस्लिम तरूणाला केवळ घातपाताचे प्रशिक्षण व हत्यारे पुरवित असते. पण त्यांनी तशी हिंसा वा घातपात घडवण्यासाठी पोषक गोंधळाची परिस्थिती पाकिस्तान निर्माण करू शकत नाही. तशी स्थिती इथेच कोणी तरी निर्माण करावी लागते, जिचा लाभ असे दहशतवादी उठवू शकत असतात. असे गद्दार आपल्यातच उजळमाथ्याने वावरत नाहीत काय?

अशा सिद्धू वा प्रशांत भूषणवर आता टिकेची झोड उठलेली आहे. पण ४० जवानांचा मारेकर्‍यांना अशी परिस्थिती निर्माण करून देणार्‍यांना प्रतिष्ठेने आपण वागवत आहोत, त्याचे काय? दहशतवादी कुठून पैदा होत असतो? तो आईच्या उदरातून थेट जिहादी म्हणून जन्म घेत नसतो. तर आसपासच्या वातावरणातून त्याची जडणघडण होत असते. कश्मिरात हजारो मुस्लिम तरूण आहेत. त्या प्रत्येकाने हाती बंदुक घेतलेली नाही की स्फ़ोटकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पकिस्तानला प्रयाण केलेले नाही. जे मुठभर त्या दिशेला वळतात, त्यांना तिकडे ढकलण्याचे काम फ़क्त हुर्रीयतवाले करीत नाहीत. तर त्यांच्या अशा उचापतींना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा व मुभा देण्याचे पाप करणारे जथ्थे इथेच बोकाळलेले आहेत. त्यातून दहशतवादी उपजत असतात. अरुंधती रॉय, प्रशांत भूषण, केजरीवाल किंवा राहुल गांधी कन्हैय्याकुमार यांच्या समर्थनाला जातात, तेव्हा प्रत्यक्षात संसदेवरील घातपाती हल्ल्याला प्रतिष्ठा मिळवून देत असतात. कोणी अफ़जल गुरूच्या फ़ाशीच्या विरोधात मानवाधिकाराचा गळा काढणारा अग्रलेख लिहीतो, तेव्हा आदिल दार सारख्या हलकटांना अफ़जल गुरू आदर्श वाटत असतो आणि त्याला पाकिस्तानात जाऊन जिहादी फ़िदायीन होण्याचे डोहाळे लागत असतात. थोडक्यात पाकिस्तानला भारताच्या विरोधात हिंसाचार घडवण्यासाठी जी तरूणांची भरती करायची असते, तिला प्रोत्साहन देणारे आपल्यातच दबा धरून बसले आहेत. शरदा पवार, जितेंद्र आव्हाडसारखे कधी नयनताराच्या नावाने आक्रोश करताना दिसतील, तर कधी भारताचे तुकडे पाडण्याच्या डरकाळ्यांना अविष्कार स्वातंत्र्य ठरवण्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावताना दिसतील. त्यांचा बंदोबस्त सुरक्षा सैनिक, गुप्तचर वा पोलिस सरकार करू शकत नाही. ती जबाबदारी आपण सामान्य नागरिकांची असते. आज टाहो फ़ोडणारे आपण ती कितीशी पार पाडत असतो? आपण काय करू शकतो?  हाच प्रश्न मनात आला ना?

याचा अर्थ इतकाच, की आपल्यातच उजळमाथ्याने वावरणार्‍या अशा गद्दार फ़ितूर लोकांविषयी आपण गंभीर नसू; तर आपण देशाच्या सुरक्षेविषयी उगाच आक्रोश करण्यात काहीही अर्थ नाही. त्यालाही देखावाच म्हणावे लागेल. आपल्याला कोणी काश्मिरात जाऊन हुरयत किंवा दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला सांगितलेले नाही. पण त्यांच्यासारख्या जिहादींना भारतीय सेनादलाच्या विरोधात हिंसा माजवायला प्रोत्साहन व हिंमत देणार्‍या कन्हैय्याकुमार  किंवा उममर खालीद यांच्या पाठीशी उभे रहाणार्‍यांचा बंदोबस्त तुम्ही आम्ही नित्य जीवनात करू शकतो ना? त्यासाठी आपल्यालाही हाती बंदुक वा बॉम्ब घेण्य़ाची काही गरज नाही. आपल्या साध्यासरळ वागण्यातून वा कृतीतून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे शक्य आहे. अगदी छोट्या छोट्या कृतीतून अशा देशद्रोह्यांचा बंदोबस्त आपण करू शकतो. आज जो उठतो, तो भारत सरकारला वा भारतीय लष्कराला पाकिस्तानला धडा शिकवा, म्हणून घोषणा देत रस्तोरस्ती फ़िरताना दिसतो आहे. पण दुसर्‍याने काय करावे हे सांगताना आपल्याला काय करणे शक्य आहे, त्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवलेला नाही. सैनिकांनी वा सरकारने काय करावे याची माहिती आपल्याला पक्की आहे. पण आपल्या जागी आपण खुप काही करू शकतो, कुठलाही कायदा न मोडता खुप काही करू शकतो, त्याचा आपल्याला पुर्णपणे विसर पडला आहे. आपल्याला बंदुक बॉम्ब ही हत्यारे वाटू लागली आहेत. पण आपल्यापाशी असलेले स्वातंत्र्य व अधिकार देखील अधिक भेदक हत्यारे असल्याचे भान सुद्धा आपल्याला राहू शकलेले नाही. म्हणून आपण पटकन म्हणतो. आम्ही सामान्य माणसे काय करू शकतो? मित्रांनो करायचे असेल तर आपण खुप काही करू शकतो.

निराश वैफ़ल्यग्रस्त मुस्लिम तरूण घडवण्याचे काम सिद्धू-भूषण वा कन्हैयाचे समर्थन राहुल-केजरीवाल करीत असतील, तर या पुरोगामी दहशतवाद्यांचा बंदोवस्त कायदा व सरकार करू शकत नाही. हे अस्तनीतले निखारे आत्ता आपणाच झटकून टाकले पाहिजेत. आपण हे नक्की करू शकतो. दिसायला किरकोळ गोष्ट आहे. आपल्याला जमणार आहे का? अशांना बहिष्कृत करणे शक्य नसेल तर उगाच धडा शिकवण्याच्या डरकाळ्या नकोत आणि सरकारला कारवाई करण्याचे सल्लेही द्यायला नकोत. रोजच्या जगण्यात कोंबडी बकरीसारखे जगावे आणि आपला नंबर लागला की निमूट मरावे.

नरेंद्र प्रभू


ईशान्य वार्ता फेब्रुवारी २०१९ अंकातून 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...