Saturday, January 24, 2015

लोटे परशुराम ते परशुराम कुंड

परशुरामाने जोडलेला दुवा

त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात  हिंदुस्थानभर संचार केल्याच्या खुणा सापडतात. आपल्या असामान्य पराक्रमाच्या जोरावर त्यानी दुष्ट आणि नराधम राज्यांचा निप्पात केला आणि धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी जिवाचं रान केलं.

परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण प्रांताची निर्मिती केली असं म्हटलं जातं. भारतात समुद्रालगतच्या अनेक ठिकाणी हिच कथा सांगितली जाते. कोकण प्रांताला तर परशुराम भूमी म्हणूनच ओळखलं जातं. तिकडे देशाच्या पुर्वोत्तर राज्यातही परशुरामाच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मातृ आणि पितृ भक्त परशुराम तर जगविख्यात आहे. पित्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून त्याने स्वत:च्या आईचंच शिर धडावेगळं केलं आणि पुन्हा पिता प्रसन्न होताच आईसाठी जीवन मागून घेतलं. आईच्या हत्तेचं हे पाप धुण्यासाठी त्याने ज्या कुंडात उडी टाकली त्या लोहीत नदी मधल्या कुंडाला परशुराम कुंड म्हणून ओळखलं जातं. त्या काळापासूनच दर संक्रातीला या कुंडात स्नान करण्यासाठी हजारो श्राद्धाळू एकत्र येत असतात.

या वर्षीच्या मकरसंक्रातीच्या पवित्रस्नाच्या वेळी पन्नास हजार भाविकांनी परशुराम कुंडाला भेट दिली. त्यापैकी तीस हजार यात्रेकरू भारताच्या विविध भागातून आले होते अशी माहिती लोहीत जिल्ह्याच्या वाक्रो प्रांताचे अतिरीक्त सहाय्यक आयुक्त श्री. दाक्तो रिबा यांनी दिली आहे. यात्रेकरूंची ही संख्या गतवर्षा पेक्षा कमी आहे असंही रीबा म्हणाले. यात्रेकरूंची ही घटती संख्या प्रशासनालाही अपेक्षीत नव्हती.

आपल्या अरुणाचल प्रदेश राज्यातला लोहीत जिल्हा निसर्गसंपदा आणि सौदर्याने भरलेला आहे. या जिल्ह्यातून वाहणार्‍या लोहीत नदीवरूनच या जिल्ह्याला लोहीत हे नाव दिलं गेलं आहे. अनेक पौराणिक आणि ऎतिहासिक कथांशी जोडल्यागेलेल्या या ठिकाणी पर्यटनाला खुपच वाव आहे. शहरी प्रदुषणाचा मागमुस नसलेला हा प्रांत बर्फाच्छादीत शिखरं, खळाळते जलप्रवाह, नद्या, सदाहरीत जंगलाने परीपुर्ण असून पर्यटकाना सदोदीत साद घालत आहे. इथली गावं देश विदेशातील पर्यटकांच आकर्षण ठरू शकतील एवढी देखणी आहेत आणि त्यानी आपली पारंपारीक नृत्य आणि कलांची जपणूकही केली आहे. पर्वतारोहण, राफ्टींग, जंगल सफारी आणि हत्तीवरून फेरफटका मारणं  अशा पर्यटनाच्या अनेक संधी असूनही त्या दृष्टीने हा भाग अजून दुर्लक्षीत राहीला आहे. परशुरामकुंड हे अरुणाचल मधील तिर्थस्थळ,  भालुकपॉंग, दिरांग, बोमदीला, से ला पास,  ही चिन-भारत युद्ध भूमी,   तळ्याचं तवांग या सर्वांचा इतिहास-भूगोलात असलेला उल्लेख एवढाच आपला असलेला संबंध असं न राहाता हिमालयाच्या कुशीत वसलेला अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा भाग असलेला कोकण प्रांत यांचं नातं परशुरामकुंड तसंच पर्यटनाच्या निमित्ताने घट्ट झालं तर विविधतेत असलेली एकात्मता या म्हणण्यालाही काही अर्थ प्राप्त होईल, नाही का?  




3 comments:

  1. छान परशुराम कुन्डाचि माहीती दिली आहे.

    ReplyDelete
  2. छान परशुराम कुन्डाचि माहीती दिली आहे.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...