Monday, February 3, 2020

समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे


सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेला सव्यसाची संपादक आणि मनमिळावू सच्चा माणूस म्हणून पत्रकार पुरुषोत्तम रानडे यांना महाराष्ट्रातील जनता गेली कित्येक वर्षं ओळखते. गेली अकरा वर्षं ईशान्य वार्ताचे संपादक पद भुषवणारे पुरुषोत्तम रानडे दर महिन्याला हा अंक प्रसिद्ध करण्यासाठी जी धडपड करीत असतात त्याला तोड नाही. ईशान्य वार्तासारखं पुर्वांचलातील राज्यांच्या समस्या, प्रश्न आणि प्रगती या विषयांना वाहिलेलं मासिक महाराष्टात तेही मराठीतून यशश्वीरित्या चालावणं हे खरोखरच मोठ्या जिकिरीचं काम आहे. संपादक पदाबरोबरच पडेल ते काम करण्याची वृती, अनेक संकटांवर जिद्दीने मात करायची हातोटी, प्रसंगानुरूप मासिकातील लेख, त्याचा दरवेळी उंचावत जाणारा दर्जा या सगळ्यासाठी सतत झटणारे रानडे साहेब ईशान्य वार्ताच्या परिवाराला आणि जवळच्या मित्रांना नवे नाहीत. यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्याना या वर्षीचा उत्तम पत्रकारीता पुरस्कार जाहिर केला आहे, त्याबद्दल  या समर्पीत पत्रकार, संपादकाचं मनापासून अभिनंदन.


पत्रकारीता आणि माध्यमं याना लोकशाहीचा चौथा खांब म्हटलं जातं. समाजाच्या स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सदैव सतर्क असणारा सच्चा पत्रकार हा खरोखरच पाशवी सत्तेलाही खाली खेचू शकतो. नमवू शकतो. पण आजच्या काळातील बहुतेक प्रत्रकारीता ही कुठलातरी अजेंडा नक्की करून, सनसनाटी बातम्या देण्याच्या अहारी जावून, देश विघातक शक्तींना मदत करताना आढळते. समाज प्रबोधन करण्यापेक्षा समाजात दरी निर्माण करण्याचं काम करते. दहशतावादी, बलात्कारी आणि देशाच्या शत्रूची बाजू लढवू पहाणार्‍या अशा लोकांना पत्रकर कसं म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला असताना पुरुषोत्तम रानडेंसारखं व्यक्तिमत्व हा एक आशेचा किरण नक्कीच आहे असं आवर्जून म्हणावसं वाटतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जाहिर केलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि उज्वल पत्रकारीतेसाठी ईशा टुर्स परिवारातर्फे मन:पुर्वक शुभेच्छा!
नरेंद्र प्रभू

                                               

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...