Friday, January 23, 2015

चोकलांगन – एक अस्पर्श गाव


तिथे जायला गाडी रस्ता आहे पण तो नावालाच. पस्तीस किलोमीटर गाडीरस्ता पार करायला तीन-साडेतीन तास लागतात.  जवळच्या नोकलॅक या शहरवजा खेड्याला जोडणारा हा रस्ता तयार झाला तोच मुळी 2010 साली. अगोदर हाच पल्ला पार करायला नवू दहा तास लागायचे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि ब्रम्हदेशाला (म्यानमार) लागून असलेलं हे गाव म्हणजे चोकलांगन. एका अर्थाने बाहेरच्या जगाचा वाराही न लागलेलं. आपलं आपल्यातच गुंतलेलं आणि गुंफलेलं एक स्वयंपुर्ण खेडं.
ब्रम्हदेशाच्या सीमेला लागून असलेल्या या खेड्यातील लोक आपल्या आपतेष्टांना भेटायला जातात ते डोंगरा पलिकडल्या गावात ब्रम्हदेशात. ब्रिटीशांनी भारत सोडताना नकाशावर मारलेल्या रेषांनी या गावकर्‍यांमध्ये अंतर पाडलं नाही. नागालँड राज्यातला तुएनसंग हा सिमावर्ती जिल्हा हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांचा बनलेला आहे, याच जिल्ह्यात हे गाव आहे. चोकलांगनसारख्या गावातील डोंगर उतारावर वस्ती करून असलेले गावकरी निसर्गाचा मान राखून, त्याला न दुखावता आपलं जीवनक्रमण करीत आहेत. आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सेवेचा मागमूसही नसलेल्या या ठिकाणी भारत आणि इंडीया या मधली दरी प्रकर्षाने जाणवत राहाते. आज या एकविसाव्या शतकात जग वाटचाल करीत असताना एकोणीसाव्या शतकातल्या राहाणीमानाशी साधर्म्य असलेलं हे गाव अजून आपल्याला किती भारत निर्माण करायचं राहून गेलं आहे याचा दाखला देतं. मोबाईल तर दूरची गोष्ट पण इथले विजेचे खांबही दिवसा उजेडीच प्रकाश बघतात आणि पुर्वांचलात लवकर होणार्‍य़ा सुर्यास्ताबरोबरच काळोखात गुडूप होतात. 2010 साली तयार करण्यात आलेला रस्ता आता नावालाच शिल्लक आहे. आपला शेजारी देश चिन भारताच्या सिमेलगत जगातले सर्वोत्तम रस्ते निर्माण करीत आहे आणि आपण तयार केलेले रस्ते दुसर्‍याच दिवशी फक्त कागदावरची रेष असतात आणि प्रत्यक्षात कालचा दिवस बरा होता म्हणण्याची पाळी स्थानिक जनतेवर येते.

तीनकशे घरटी असलेल्या चोकलांगन गावात 2640 गावकरी वसती करून आहेत असं तिथली व्यवस्ता सांगते. या एवढ्या लोकवस्तीला भारतात सर्वसाधारण गावात असलेली कुठलीच सेवा-सुविधा किंवा सोय सवलत आज तागायत मिळालेली नाही. सरकार दप्तरी या गावाला  1986 साली विज पुरवठा केल्याचा उल्लेख आढळला तरी 2002 साली पुन्हा एकदा हे गाव विजेच्या तारांनी जेडलं गेलं पण त्या तारांमधून अभावानेच विज प्रवाह खेळत असतो. हे आपल्यां कडून असं असलं तरी ब्रम्हदेशातल्या शेजारी तैगन गावामधून जीवाभावाचा अनोखा प्रवाह या गावापर्यंत सतत वहात असतो. खैमुनगन या एकाच जमातीतले हे लोक चोकलांगन आणि तैगन गावात वसती करून पिढ्यानपिढ्या रहात आहेत. दोन वेगवेगळ्या देशात राहूनही या लोकांमधला बंधूभाव तसूभरही कमी झालेला नाही.

एवढ्या समस्या असल्या तरी इथले लोक खुपच समाधानी आहेत. या गावात गेल्यास अगदी प्रत्येक घर अभ्यागताचं स्वागत करायला उत्सुक असतं. बांबुच्या झोपडीवजा घराशेजारी खेळ खेळणारी लहान मुलं दगड, बांबू, लाकूड अशाच गोष्टी हातात घेवून खेळत असतात. शाळेत शिकायच्या या वयात मात्र त्याना शिकायला शाळाच नाही. पण हे पट्ठे बांबू हातात धरायला शिकल्यानंतर त्याच बांबूपासून तर्‍हतर्‍हेच्या वस्तू बनवायला केव्हा शिकतात ते त्यांचं त्यानाच कळत नाही. इथला प्रत्येकजण परंपरागत बांबूकामात पारंगत आहे. वर्षभरात अल्पकाळ केली जाणारी डोंगर उतारावरची शेती सोडल्यास उरलेल्या वेळी बांबूकामात गुंतलेले इथले हात वयाच्या ऎशीव्या वर्षीही थकत नाहीत.

चोकलांगन हे खेडं जरी आधुनीक जगापासून आणि सोयी सुविधांपासून कोसो दूर असलं तरी याच आधुनीक जगाच्या शोषणा पासून इथला निसर्ग वाचला आहे. म्हणूनच इथली निसर्ग संपदा पाहाताना आपल्याला माणसाने अनिर्बंध वापर करायच्या आधीचं जग पाहिल्याच सुख नक्कीच मिळतं. म्हणूनच हे खर्‍य़ा अर्थाने न बिघडवलेलं जग पहाण्यासारखं आहे. या गावाकडे घेवून जाणारा रस्ता भले ओबडधोबड आहे पण तो ओलांडून गेल्यावर हिरव्यारंगात न्हालेल्या अनंत छटा, निळाईत आणि धुक्याच्या दुलईत धुसर होत जाणारे डोंगर कडे, झुळझुळत जाणारे झरे, बांबूची बेटं असं दिसणारं तिथलं दृष्य आपलं मन मोहून टाकेल यात शंकाच नाही.


या चोकलांगनबद्दल ऎकलं आणि मला माझ्या लहाणपणची कोचरा या गावातून परुळ्याला जाणारी डोंगरातली वाट आठवली. झाड-झाडोरा, तुफान वारा, इकडून तिकडे सतत हालचाल करणारे पक्षी, कधी चुकून दिसणारे पण मनाचा थरकाप उडवणारे बिबळा, रान डुक्कर किंवा रानरेड्यासारखे  हिंस्र प्राणी. दूरवर समुद्रात पसरलेला सिधुदुर्ग किल्ला. वर निळं आकाश आणि पायाखाली कधीही चुकूशील म्हणणारी पाऊलवाट. एक डोंगर चढावा आणि दुसर्‍या बाजूला उतरावं. सहा ऋतू आणि त्रिकाळ वेगवेगळ्या रुपात दर्शन देणारा निसर्ग. आधुनिकतेचं वारं नसलं तरी सतत कात टकत जाणारा हा सगळा परिसर मनाला मोहवून टाकत असे.  

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...