Showing posts with label देशद्रोह. Show all posts
Showing posts with label देशद्रोह. Show all posts

Wednesday, March 6, 2019

आपण यांच्यावर बहिष्कार कधी टाकणार?





पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असताना एनडीटीव्ही(NDTV) च्या एका महिला पत्रकाराने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. या महिला पत्रकाराने व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवणारी संतापजनक पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार समोर येताच एनडीटीव्हीने याची दखल घेत संबंधित महिला पत्रकाराला फक्त दोन आठवड्यांसाठी निलंबत केलं आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र या हल्ल्याचा निषेध होत असाताना एनडीटीव्हीच्या वरिष्ठ महिला संपादक निधी सेठी हिने आपल्या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवली. ’56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले अशा आशयाचं ट्विट करत सेठी हिने #HowsTheJaish असा हॅशटॅगही वापरला. दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारा हॅशटॅग म्हणून #HowsTheJaish या हॅशटॅगकडे पाहिलं जातं.

तीची पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला चांगलंच धारेवर धरलं. नेटकऱ्यांनी निधी सेठी हिला तीच्या वादग्रस्त पोस्टचा जाब विचारत चांगलेच झापले. मोठ्या प्रमाणात निधी सेठी हिला ट्रोल करण्यात आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एनडीटीव्हीने कारवाई करत निधी सेठी हिला दोन आठवड्यांसाठी निलंबित केलं.

भारतत राहून, या देशाचं खाऊन, इथल्या पैश्यावर मौजमजा मारून असा देशविघातक विषारी विचार यांच्या नसानसात भरला आहे त्या नालायक पत्रकारांचा आणि त्याना पाठीशी घालणार्‍या NDTV सारख्या प्रसारमाध्यमांचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि समस्त भारतीयांनी त्यांच्यावर निदान बहिष्कार तरी घातला पाहिजे.

श्रद्धांजलीसाठी एकजुट नको, टुकडे टुकडे गर्जणार्‍यांच्या व त्याच्या समर्थकांच्या विरोधात एकजुट होता आले तर बघा.


ही घटना राजकीय लाभासाठी वापरणार नाही असे कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वच्छ सांगून टाकलेले होते. पण त्यांच्याच पक्षाचे पंजाबातील एक मंत्री नवज्योत सिद्धू यांनी तात्काळ प्रतिक्रीया देताना निषेध वा बदल्याची बाब बाजूला ठेवून पाकिस्तानशी संवाद करूनच संघर्ष रोखता येईल, अशी मुक्ताफ़ळे उधळलेली आहेत. दुसरीकडे राहुलच्याच सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख दिव्य स्पंदना यांनी अगत्याने त्याच राष्ट्रीय भावनांना पायदळी तुडवित प्रशांत भूषण यांच्या सिद्धूसारख्याच प्रतिक्रीया सोशल मीडियाच्या कॉग्रेस खात्यावर पुनर्मुद्रीत केल्या होत्या. हा कश्मिरी तरूणाने केलेला हल्ला आहे आणि काश्मिरातील तरूण अशाप्रकारे दहशतवादाकडे वळत असल्याला भारत सरकारचे धोरण व तिथली लष्करी कारवाईच जबाबदार असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केलेला आहे. त्यांनी काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावे, असी सुचना यापुर्वी अनेकदा मांडलेली आहे आणि अशा जिहादी दहशतवादी घातपातानंतर त्यातल्या संशयितांना वाचवण्यासाठी भूषण यांच्यासारखे वकील नेहमीच पुढे आलेले आहेत. अशाचप्रकारे भारतीय संसद भवनावरच्या हल्ल्यात अफ़जल गुरू दोषी ठरलेला असताना त्याच्याही समर्थनाला भूषण व तत्सम अनेकजण समोर आलेले आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या फ़ाशीचा निषेध करणार्‍या सोहळ्यात या लोकांनी वारंवार सहभाग घेतलेला आहे. अशा एका सोहळ्याचे आयोजन नेहरू विद्यापीठात झाले, तेव्हा अफ़जल गुरूचे समर्थन व भारताचे तुकडे करण्याच्या डरकाळ्या फ़ोडल्या गेल्यावर काहूर माजले. तर घोषणा देणार्‍यांच्या समर्थनाला राहुल गांधींसह केजरीवालही जाऊन पोहोचले होते.

आपल्या जागी आपले काम वा कर्तव्यही ज्यांना धड बजावता येत नाही, हे लोक आज शिरजोर झालेत. ही आपल्याला घातपातापेक्षाही अधिक भेडसावणारी समस्या झालेली आहे. गुप्तचर खाते झोपलेले होते काय? असलेही सवाल सरकारला हे विचारत असतात. बंगालमध्ये सीबीआयला आपली कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अधिकार्‍यांना अटक करण्यापर्यंत मजल मारणार्‍या ममता आता त्याच थाटात गुप्तचर व सुरक्षा सल्लागार काय करीत होते; असा सवाल करीत आहेत. मात्र आपल्या हाती जो अधिकार वा स्वातंत्र्य आलेले आहे, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे सौजन्यही त्यांच्यापाशी कधी आढळून येत नाही. आपल्या कर्तव्यात लहानसहान बाबतीत कसुर करणारेच; सरकार, गुप्तचर, सुरक्षा दलांना नित्यनेमाने सवाल विचारू लागतात, तेव्हा आधीच जीव धोक्यात घालून राखण करणार्‍यांचे लक्ष किती विचलीत होत असेल? त्यांचे विचलीत लक्ष वा गोंधळलेपणा पाकिस्तानच्या दहशतवादी संस्था संघटनांसाठी सर्वात मोठी मदत असते. चकमकीत गुंतलेल्या लष्कराच्या जवानांना मागून धोंडे मारून विचलीत करणारे हुर्रीयतचे भाडोत्री निदर्शक आणि उठल्यासुटल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नांचा भडीमार करणार्‍यांमध्ये नेमका कोणता गुणात्मक फ़रक असतो? (ही सुरक्षा दळांवर केलेली वैचारीक दगडफेक नव्हे का?)  पाकिस्तान कुणा कश्मिरी वा भारतीय बहकल्या मुस्लिम तरूणाला केवळ घातपाताचे प्रशिक्षण व हत्यारे पुरवित असते. पण त्यांनी तशी हिंसा वा घातपात घडवण्यासाठी पोषक गोंधळाची परिस्थिती पाकिस्तान निर्माण करू शकत नाही. तशी स्थिती इथेच कोणी तरी निर्माण करावी लागते, जिचा लाभ असे दहशतवादी उठवू शकत असतात. असे गद्दार आपल्यातच उजळमाथ्याने वावरत नाहीत काय?

अशा सिद्धू वा प्रशांत भूषणवर आता टिकेची झोड उठलेली आहे. पण ४० जवानांचा मारेकर्‍यांना अशी परिस्थिती निर्माण करून देणार्‍यांना प्रतिष्ठेने आपण वागवत आहोत, त्याचे काय? दहशतवादी कुठून पैदा होत असतो? तो आईच्या उदरातून थेट जिहादी म्हणून जन्म घेत नसतो. तर आसपासच्या वातावरणातून त्याची जडणघडण होत असते. कश्मिरात हजारो मुस्लिम तरूण आहेत. त्या प्रत्येकाने हाती बंदुक घेतलेली नाही की स्फ़ोटकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पकिस्तानला प्रयाण केलेले नाही. जे मुठभर त्या दिशेला वळतात, त्यांना तिकडे ढकलण्याचे काम फ़क्त हुर्रीयतवाले करीत नाहीत. तर त्यांच्या अशा उचापतींना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा व मुभा देण्याचे पाप करणारे जथ्थे इथेच बोकाळलेले आहेत. त्यातून दहशतवादी उपजत असतात. अरुंधती रॉय, प्रशांत भूषण, केजरीवाल किंवा राहुल गांधी कन्हैय्याकुमार यांच्या समर्थनाला जातात, तेव्हा प्रत्यक्षात संसदेवरील घातपाती हल्ल्याला प्रतिष्ठा मिळवून देत असतात. कोणी अफ़जल गुरूच्या फ़ाशीच्या विरोधात मानवाधिकाराचा गळा काढणारा अग्रलेख लिहीतो, तेव्हा आदिल दार सारख्या हलकटांना अफ़जल गुरू आदर्श वाटत असतो आणि त्याला पाकिस्तानात जाऊन जिहादी फ़िदायीन होण्याचे डोहाळे लागत असतात. थोडक्यात पाकिस्तानला भारताच्या विरोधात हिंसाचार घडवण्यासाठी जी तरूणांची भरती करायची असते, तिला प्रोत्साहन देणारे आपल्यातच दबा धरून बसले आहेत. शरदा पवार, जितेंद्र आव्हाडसारखे कधी नयनताराच्या नावाने आक्रोश करताना दिसतील, तर कधी भारताचे तुकडे पाडण्याच्या डरकाळ्यांना अविष्कार स्वातंत्र्य ठरवण्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावताना दिसतील. त्यांचा बंदोबस्त सुरक्षा सैनिक, गुप्तचर वा पोलिस सरकार करू शकत नाही. ती जबाबदारी आपण सामान्य नागरिकांची असते. आज टाहो फ़ोडणारे आपण ती कितीशी पार पाडत असतो? आपण काय करू शकतो?  हाच प्रश्न मनात आला ना?

याचा अर्थ इतकाच, की आपल्यातच उजळमाथ्याने वावरणार्‍या अशा गद्दार फ़ितूर लोकांविषयी आपण गंभीर नसू; तर आपण देशाच्या सुरक्षेविषयी उगाच आक्रोश करण्यात काहीही अर्थ नाही. त्यालाही देखावाच म्हणावे लागेल. आपल्याला कोणी काश्मिरात जाऊन हुरयत किंवा दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला सांगितलेले नाही. पण त्यांच्यासारख्या जिहादींना भारतीय सेनादलाच्या विरोधात हिंसा माजवायला प्रोत्साहन व हिंमत देणार्‍या कन्हैय्याकुमार  किंवा उममर खालीद यांच्या पाठीशी उभे रहाणार्‍यांचा बंदोबस्त तुम्ही आम्ही नित्य जीवनात करू शकतो ना? त्यासाठी आपल्यालाही हाती बंदुक वा बॉम्ब घेण्य़ाची काही गरज नाही. आपल्या साध्यासरळ वागण्यातून वा कृतीतून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे शक्य आहे. अगदी छोट्या छोट्या कृतीतून अशा देशद्रोह्यांचा बंदोबस्त आपण करू शकतो. आज जो उठतो, तो भारत सरकारला वा भारतीय लष्कराला पाकिस्तानला धडा शिकवा, म्हणून घोषणा देत रस्तोरस्ती फ़िरताना दिसतो आहे. पण दुसर्‍याने काय करावे हे सांगताना आपल्याला काय करणे शक्य आहे, त्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवलेला नाही. सैनिकांनी वा सरकारने काय करावे याची माहिती आपल्याला पक्की आहे. पण आपल्या जागी आपण खुप काही करू शकतो, कुठलाही कायदा न मोडता खुप काही करू शकतो, त्याचा आपल्याला पुर्णपणे विसर पडला आहे. आपल्याला बंदुक बॉम्ब ही हत्यारे वाटू लागली आहेत. पण आपल्यापाशी असलेले स्वातंत्र्य व अधिकार देखील अधिक भेदक हत्यारे असल्याचे भान सुद्धा आपल्याला राहू शकलेले नाही. म्हणून आपण पटकन म्हणतो. आम्ही सामान्य माणसे काय करू शकतो? मित्रांनो करायचे असेल तर आपण खुप काही करू शकतो.

निराश वैफ़ल्यग्रस्त मुस्लिम तरूण घडवण्याचे काम सिद्धू-भूषण वा कन्हैयाचे समर्थन राहुल-केजरीवाल करीत असतील, तर या पुरोगामी दहशतवाद्यांचा बंदोवस्त कायदा व सरकार करू शकत नाही. हे अस्तनीतले निखारे आत्ता आपणाच झटकून टाकले पाहिजेत. आपण हे नक्की करू शकतो. दिसायला किरकोळ गोष्ट आहे. आपल्याला जमणार आहे का? अशांना बहिष्कृत करणे शक्य नसेल तर उगाच धडा शिकवण्याच्या डरकाळ्या नकोत आणि सरकारला कारवाई करण्याचे सल्लेही द्यायला नकोत. रोजच्या जगण्यात कोंबडी बकरीसारखे जगावे आणि आपला नंबर लागला की निमूट मरावे.

नरेंद्र प्रभू


ईशान्य वार्ता फेब्रुवारी २०१९ अंकातून 

Thursday, January 5, 2017

सर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद


‘ईशान्य वार्ता’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख 


जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं होतं. त्या आधी दहशतवाद्यानी घडवून आणलेल्या घातपाती कारवायात भारतीय लष्कराचे अठरा जवान कामी आले होते. सीमेवरच्या राज्यात अशा प्रकारचे हल्ले करून शेजारच्या देशात आश्रय घ्यायचा ही दहशतवाद्याची नेहमीचीच चलाखी. असे हल्ले वर्षोंवर्ष होत असूनही राजकिय इच्छाशक्तीच्या अभावी त्याचा चोख बंदोवस्त होत नव्हता. राजकिय निर्णयाचा अभाव असल्याने सेनादलाचे हात बांधलेले असायचे. केंद्रीय सरकारमध्ये सत्तापालट झाल्यावर मोदी सरकारने ‘ऍक्ट इस्ट’, ‘मेक इन इंडीया’ सारखी धोरणं आखून या प्रकारच्या कारावायांवर सर्वंकश नियंत्रण मिळवण्याचा तसंच समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दहशतवाद ही आता संपुर्ण जगाची समस्या असून त्याला कोणताही देश अपवाद नाही. या विरोधात उपाययोजना करायची असेल तर जागतीक नेत्यांचं एकमत होणं जरुरीचं आहे. गेल्या दोन वर्षात दिवसरात्र एक करून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जगभरातील अनेक देशाचे दौरे केले आणि भारताचे हितसंबंध जपण्यांचं आणि त्यात वाढ करण्याचं महत्वाचं काम केलं. दहशतवादाचा मुकाबला करणं हासुद्धा त्या रणनितीचा एक भाग होता. आसामसारख्या राज्यात त्यानंतरच सत्ता परिवर्तन झालं. केंद्र सरकारच्या कृतीला जनतेचा पाठिंबा मिळाला.

देशाच्या पूर्व सीमेवर अशा प्रकारची कारवायी होत होती तोपर्यंत त्यावर देशभरातून फार मोठी प्रतिक्रिया येत नव्हती पण पाकिस्तानच्या सीमेत घूसून ‘सर्जिकल ऑपरेशन’ करून  दहशतवादी आणि त्याच बरोबर पाक सैनिकांना कंठस्नान घतल्यावर मात्र पाकिस्तानचे इथले हस्तक किंवा पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले लोक संभ्रम निर्माण व्हावा अशी वक्तव्य करायला लागले आहेत. आजपर्यंत भारतीय सेनेवर देशातून असा संशय व्यक्त केला गेला नव्हता. लष्कराने केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले गेले नव्हते मग आत्ताच ते का मागण्यात येत आहेत? पाकिस्तानचे भारतातले हे ‘डीप असेट्स’ खाल्ल्या अन्नाला जागत आहे काय? की जनता मोदींना डोक्यावर घेऊन नाचेल म्हणून भयभित झाले आहेत? मोदींना विरोध करायचा म्हणून ही पुरोगामी मंडळी आता थेट पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवू लागली आहेत. या पैकी अनेकजण या पुर्वीच्या सरकाराचा भाग होते, कित्येकजण पत्रकार बनून अपप्रचार करीत आहेत, परकिय पैशावर पाळल्यागेलेल्या एनजीओचाही त्यात सक्रिय सहभाग दिसतो आहे.

ही मंडळी काय करतात तर ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्ला... इन्शाअल्ला...’ असे नारे देणार्‍याला डोक्यावर घेऊन नाचतात, त्याची भलामण करतात. आम्हीपण सर्जिकल स्ट्राईक केले होते पण त्याचा गवगवा केला नाही असा तद्दन खोटा दावा करतात, औरंगजेबाला सुफी संताचा दर्जा द्यावा आणि त्याच्या विरोधातली सगळी विधानं पाठ्यपुस्तकामधून काढून टाकावित म्हणून उपोषणाला बसतात. (मग शंभूराज्याना कुणी मरलं? असा प्रश्न त्याना विचारायचा नसतो.) पाकिस्तानच्या टिव्ही वाहिन्यावरच्या चर्चेमध्ये भाग घेऊन मोदी सत्तेत असे पर्यंत भारत-पाक चर्चा होऊ शकणार नाही, त्यासाठी त्याना सत्ताभ्रष्ट करावं लागेल आणि पकिस्तानने या कामी आपल्याला मदत करावी म्हणून आर्जवं करतात. पाकिस्तानी कलाकारांचा कैवार घेऊन  दहशतवाद आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून बुद्धीभेद करतात. पाकिस्तानी सामान्य जनता आणि कलाकार किती महान आहेत याचे दाखले द्यायची अहमहमिका लागते. या कलाकारांच्या नांगीत किती विष भरलेलं असतं त्याची वानगीदाखल ही एकच गोष्ट लक्षात ठेवली तरी दृष्टी साफ होईल. जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेली हकिकत त्या पाकिस्तानी कलाकारांविषयी सगळं सांगून जाते. ती गोष्ट अशी:

जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता.

हा पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. भारताशी प्रत्यक्ष युद्ध करून यश मिळवता येणार नाही याची पक्की खात्री असणार्‍या पाकिस्तानने वर्षानुवर्ष डावपेच आखून आपली माणसं भारतात पेरली आहेत. ते पाकिस्तानी हस्तक अतिशय मोक्याच्या जागा धरून बसलेत किंवा मोक्याच्या जागी बसलेल्यांनाच शत्रू त्याचे हस्तक म्हणून निवडत व नेमत आला आहे. त्यात बुद्धीजिवी, प्राध्यापक, कलावंत, पत्रकार, अधिकारी,राजकारणी अशा विविध पेशातील मंडळींची निवड होत असते. त्यांनी आपली बुद्धी समाजाच्या बुद्धीभेदासाठी पणाला लावावी, अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. हेच ते घरभेदी तत्कालिन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना दिर्घकाळ माध्यमातून लक्ष्य करीत होते. सिंग यांच्या कालावधीमध्ये काश्मिरात लष्कराने मोठे यश मिळवलेले होते आणि अनेक जिहादी दहशतवादी उचापती सोडून मुख्यप्रवाहात येण्य़ाची प्रक्रिया सुरू झालेली होती. तिलाच शह देण्यासाठी लष्कर दिल्लीवर चाल करून येणार होतं अशा अफ़वा पिकवण्यात आल्या होत्या. दहशतवादाला वेसण घालणारी सिंग यांची मोहिम हाणून पाडण्यासाठीचे हे काहूर पद्धतशीरपणे माजवण्यात आलं होतं. देशामध्ये लष्करी उठाव होणार असल्याची अफ़वा पाकिस्तानने फ़ैलावलेली नव्हती तर इथल्या माध्यमवीरांनी आणि पत्रकारांनी ती तिखटमिठ लाऊन जनतेसमोर आणली होती. आता तीच मंडळी भारताचे लष्करी कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घोषणा करतानाच पुरावे असल्याचे सांगितले असूनही त्यावर संशय व्यक्त करीत आहेत. 

या घरभेद्यांच्या कारवायामुळेच पाकिस्तानची सीमेवर कुरापती काढण्याची हिम्मत होते. मग सीमेवरच काय मुंबईवरही हल्ले होतात. मुंबई हल्ल्याच्यावेळीही सर्जिकल ऑपरेशन करता आलं असतं पण तत्कालिन गृहमंत्री कपडे बदलण्यात व्यस्त आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आपल्या मुलाला सिनेमात प्रमोट करण्यासाठी अतिरेक्यांच्या भक्षस्थानी पडलेल्या हॉटेल ताजची सफर सिनेदिग्ददर्शकाबरोबर करीत फिरत होते. या घटनांचं गांभिर्यच हरवलं होतं. परिणामी हेच पुरोगामी हस्तक घटनेच live फुटेज पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या बॉसना पुरवीत होते तरी त्यांच्यावर कोणतीही कारवायी झाली नाही. ही पकिस्तानी अतिरेक्यांना केलेली थेट मदत होती. अशा प्रकारे भारताला युद्ध परवडणारं नाही असं एका बाजूला सांगत दुसर्‍या बाजूने दहशतवाद्याना थेट मदत करण्याचं काम याच पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळीनी चालवलं आहे. या अशा गोष्टींमुळेच लष्कर आणि पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होत असतं. त्याना थारा कोण देत हा खरा प्रश्न आहे. शेवटी अख्खा देश म्हणजे फक्त सैन्य नव्हे, की तेच फक्त लढतील. राजकारणी, नोकरशहा, पत्रकार, कलाकार आणि सामन्य जनता असे सगळे मिळूनच तो देश बनतो. हाच न्याय पाकिस्तानलाही आहे, त्यांचे कलाकार हे त्या देशाचा भाग आहे आणि पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असेल तर ते कलाकारही त्या शत्रूचाच भाग आहेत. ते दहशतवाद्यांचे हस्तक असू शकतात. त्याना दिवाणखान्यात आश्रय का द्यायचा? ते कलाकार तरी वेगळे करता येतात पण त्यांचे भारतातले साथीदार ओळखणं गरजेचं आहे.

खरा धोका किंवा जास्त धोका कुणापासून? पाकिस्तानकडून की चीनकडून असाही एक प्रश्न निर्माण करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. तो धोका दोन्ही बाजूने आहे आणि आता तर हे दोन्ही शत्रू एक झाले आहेत. बलुचीस्तान या आपल्याच पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या प्रांतात तिथल्या जनतेला चिरडून हे चालू आहे. तो भाग पाकिस्तानने चीनला आंदण दिला आहे. सीमेवर सैनिक लढतच आहेत, त्याना आपण घरात बसून मदत करू शकतो, कशी तर चीनी मालावर बहिष्कार घालून, ‘मेक इन इंडीया’ला साथ देऊन आणि पाकिस्तानच्या इथल्या पुरोगामी दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखऊन, निवडणूकात चारीमुंड्या चीत करून आपण आपल्यातला देशाभिमान जागृत असल्याचा पुरावा देवू शकतो. सर्जिकल ऑपरेशनच्या पुराव्यापेक्षा या पुराव्याची जास्त जरुरी आहे आणि हाच पुरावा या मंडळींचा बुरखा फाडून टाकेल.             

नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई

Thursday, April 7, 2016

जेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र


एप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये प्रसिद्ध झालेला लेख: 

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ ला डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियन’ (डीएसयू)च्या माजी सदस्यांनी सभा बोलावली होती. अफझल गुरू आणि मकबूल भटचा  न्यायव्यवस्थेने खून केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्या विरोधात आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या लोकशाही हक्कासाठी चाललेल्या लढय़ालापाठिंबा देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तिला कॅम्पसमधले आणि बाहेरचे बरेच काश्मिरी विद्यार्थी उपस्थित होते. अफझल गुरूच्या स्मरणार्थ अ कंट्री विदाऊट अ पोस्ट ऑफिसहा कार्यक्रम तिथे  आयोजित करण्यात आला होता. डीएसयू हा कट्टर डाव्या विचाराच्या, माओवादावर विश्वास असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट आहे. छत्तीसगढमधल्या माओवाद्यांना त्यांचं समर्थन आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने खळबळ माजली आहे.  डाव्या पक्ष संघटनांनी आता दिशाभूल करण्याची निती अवलंबली आहे. जो मुद्दा आहे त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ माजवायचा ही त्याची नेहमीची चाल आहे. इथेही तेच घडले आहे ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने तिथे अफ़जल गुरूचे उदात्तीकरण झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्याबरोबर त्यानी तात्काळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा गळा काढला. डीएसयू चा नेता कन्हय्या कुमार याला अटक झाल्याबरोबर आदल्या दिवशीपर्यंत वाहिन्यांवर झळकणारा उमर खालीद हा विद्यार्थी नेता फरार झाला. हा उमर खालीद DSU (डोमोक्राटीक स्टूडंट युनियन)चा नेता DSU ही कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाची विद्यार्थी संघटना. याच उमर खालीदचा या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य हात होता.  उमर खालीदचे वडील सैय्यद कासिम इलियास हे सिमी या संघटनेचे प्रमुख नेते होते. विद्यापीठात पोलिस आलेच कसे? हा नवा युक्तीवाद डाव्यांकडून पुढे करण्यात आला आहे. पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय? बाहेरचे विद्यार्थी इथे येऊ शकतात मात्र पोलिसांना मज्जाव का करण्यात येतो?  देशप्रेमी नागरीकांना छळणारे अनेक प्रश्न या प्रकरणातून पुढे आले आहेत. या घटनेआधी उमर खालीदने काश्मीर आणि खाडी देशात अनेक फोन केले होते अशी माहिती उजेडात येत आहे. देशविरोधी कारवाया आणि माओवाद्यांच्या काश्मीर कनेक्शनचाच हा भाग आहे. आणि स्वतंत्र्य म्हणजे वैराचार नव्हेच. २०१० मध्ये दंतेवाडा इथं लक्षलवादी हल्ल्यात ७५ जवान शहीद झाले होते तेव्हा याच जेएनयु विद्यापीठात विजय दिन साजराकरण्यात आला होता ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. देशात दुर्गापूजा केली जाते तेव्हा इथे महिषासूर पुजाला जातो अशी ही औलाद आहे.     
     
या वेळी “भारत तेरे टुकड़े होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह, अफज़ल हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं, अफज़ल तेरे खून से इन्किलाब आएगा, भारत की बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी” अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. यावर कॉग्रेस सहीत सर्वच विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की नुसत्या घोषणा देणं म्हणजे देशद्रोह नव्हे. हे म्हणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य!  हे बुद्धी दिवाळखोरीत निघाल्याचं लक्षण आहे.. माणसाचे तुकडे तुकडे करू म्हणून घमकी दिली तर मात्र ती जिवे मारण्याची धमकी म्हणून गुन्हा होईल पण देशाचे तुकडे तुकडे करू म्हणणार्‍याची जिभ हासडून टाकली पाहिजे असं यांना वाटत नाही. जगात आयसिसचा धोका टोकाला गोलाय, जगाचं कशाला आपल्याच काश्मीरच्या पंपोरमध्ये अतिरेक्याशी  जिवाची बाजी लाऊन लढणार्‍या (या चकमकीत सेनादलाचे पाच वीर शहीद झाले) सैनिकांवर काश्मीरमधले नागरिक एकत्र येऊन दगडफेक करतात आणि बाजूच्या मशीदीमधून अतिरेक्यांचं गुणगान गाऊन त्यांना पांठिंबा दिला जातोय, ही हिम्मत येते कुठून? तर आपल्याच संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्याबाजूने बोलून आपलेच कॉगेसी खासदार पाकिस्तान आणि दोशद्रोही अतिरेकी यांना पाठबळ देत आहेत या सारख्या ग़्हटनांमुळे या वोषवल्लीला खत पाणी घातलं जातं. बरं या अफजल गुरूला आपलंच सरकार असताना फासावर चढवलं गेलं हे पण ते निर्लजपणे नजरेआड करतात. ही देशविरोधी विषवल्ली वेळीच मुळासकट उखडून टाकली पाहिजे, त्याशिवाय या देशाला चांगले दिवस दिसणार नाहीत. अतिरेक्यांशी सामना करताना मानवीहक्क, सहिष्णूता असले मुद्दे दुय्यम ठरतात. लोकशाही समाजव्यवस्था असलेला जगातला सर्वात मोठा देश असलेल्या भारतातच ही थेरं खपऊन घेतली जात आहेत. ज्या लोकशाहीचा जगात उदौदो केला जातो त्या अमेरीकेतल्या विद्यापिठात ‘ओसामा हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं’ म्हणण्याची कुणाची हिम्मत होईल काय? आंधळा मोदी विरोध करणारी ही मंडळी आता देशाच्या मुळावर उठलीत आणि मोदी पंतप्रधान व्हायच्याआधी हेच  लोक त्याना अमेरीकेचा विजा दिला जावू नये म्हणून अमेरीकेची आर्जवं करीत होते.

अफजल गुरू, कसाबसारख्या अतिरेक्यांना फाशीच्या दोरापर्यंत नेण्यासाठी आपल्या देशात अनेक वर्षं न्यायालयात संघर्ष करावा लागतो. त्या नंतर असे काहीच अतिरेकी फासावर लटकवता येतात. आता या अतिरेक्यांचा कळवळा आलेले लोक त्या न्यायालयांचाही अपमान करीत आहेत. ‘चार-दोन व्यायमुर्तींनी ठरवलं म्हणून अफजल गुरू दोषी ठरत नाही’ असं उमर खालीद उघडपणे वाहीन्यांवर येऊन सांगतो? भारतीय व्यायव्यवस्थेला हे लोक किती किम्मत देतात ते यावरून लक्षात घ्यायला पाहीजे. काश्मीरमध्ये Thank you JNU चे फलक दाखवणारे आणि इथे दिल्लीत विद्यापिठात वर्षानुवर्ष भारतमातेच्या अन्नावर पालनपोषण झालेले मावोवादी एकच आहेत. सापाला किती दिवस असं दुध पाजत बसायचं? काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया सुरू होण्याआधी काश्मीर विद्यापिठात बॉम्बस्पोट झाले होते ही गोष्ट विसरून चालणार नाही.

प. बंगालच्या मालदा मध्ये घडलेली घटना, मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांचा विनयभंग आणि पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न अशा घटनांना दंगली या सदरात मोडता कमा नये तर त्या अतिरेकी कारवाया म्हणूनच त्यावर कारवाई केली पाहिजे न पेक्षा भारताचा सिरीया व्हायला वेळ लागणार नाही.                                                                        
पुण्याच्या फ़िल्म संस्थेतील  विद्यार्थी आणि जेएनयु मध्ये देशविरोध घोषणा देणारे विद्यार्थी हे तिथे कित्येक वर्ष ठाणमांडून सर्व सोईसुविधांचा अखंड लाभ घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना किती वर्षे  विद्यापीठामधील वसतीगृहांचा वापर करु द्यावा याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
भारत विकासाच्या वाटॆवर आहे हिच खरी तर विरोधकांची दुखरी बाजू आहे. देश आणि जगभरात हे स्पष्ट होऊ लागताच प्रत्येकवेळी या सकारात्मक बाबींवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीविरोधाला उत आला. त्याची वानगी दाखल उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.    

ओबामांची भारत भेट  - चर्चमधल्या चोर्‍यांचा चर्चवरचा हल्ला म्हणून गहजब.
भार-आफ्रिका फोरम समिट – बिफवरुन राजकारण
बिहार निवडणूक – पुरस्कार वापसी
पुर्वांचलाचा विकास – रोहित वेमूला आत्महत्येचं राजकारण
मेक इन इंडीया विक – जेएनन्यु कांड
  
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला हेतूता हवा देण्यात आली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आर्थिक आघाडीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यता अनुदान आणि मनरेगासारख्या योजनामधून खर्च होणारा केंद्रसरकारचा निधी यांना लागलेली गळती थांबवण्यावर सरकारला यश प्राप्त होत आहे. नेमकी हीच गोष्ट हितसंबंधी लोकांना खुपते आहे. योजनांमधला निधी परस्पर हडप करण्याच्या या कारस्थानाला ‘आधार’ आणि जनधन खात्यांच्या मार्फत सरकारने आळा घातला असताना त्यामुळेच अस्वस्थ झालेली मंडळी ‘असहिष्णूता’, ‘अभिव्यक्ति स्वातंत्र्य’ असल्या मुद्द्यांची ढाल पुढे करून सरकार अस्थिर सरण्याचा प्रयत्न करीत आहेत.                

क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी देशविरोधी कारवाया करायच्या आणि विपर्यास करून राज्य घटनेचा आधार घ्यायचा ही कमुनिस्टांची जुनी रितच आहे. पण आश्चर्य वाटतं ते देशावर साठवर्षाहून अधिककाळ राज्य केलेल्या कॉग्रेस पक्षाचं. त्यानाही ही विपरीत बुद्धी का होते? प. बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि डावे यांची युती होणार त्याची परिणीती म्हणून हे नेपथ्य तयार करण्यत आलेले आहे काय? कॉग्रसचे नेते दिग्विजय सिंग तर निवडणूक जिंकण्यासाठी नक्षलवाद्याची मदत मागतात तर त्याच पक्षाचे दुसरे नेते मोदींना पराभूत करण्यासाठी पाकमध्ये जावून पाकची मदत मागतात. कॉग्रेसच्या रिटा बहुगुणाचं म्हणणं   विश्वविद्यालयात तिरंगा फडकावयाचा आदेश देणं लाजिरवाणं आहे. इसरत जहाला थेट शहीद दर्जा देणारे ते हेच लोक, (शहीद हणूमंतप्पा असतो इसरत जहा नव्हे) युपीए  सरकारच्या काळात डेव्हीड हेडलीने इसरत जहा आत्मघातकी पथकाची सदस्य होती असं तपास अधिकार्‍यांना सांगितलं होतं पण केवळ नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तपास अधिकार्‍याला त्याच्या मुळ राज्यात परत पाठवून त्या सरकारने ती गोष्ट लपऊन ठेवली. या प्रकरणात अनेक प्रामाणिक अधिकार्‍याना अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं. आता न्यायालयात हेडलेने साक्ष देताना ती गोष्ट पुन्हा सांगितली तेव्हा जनतेला सत्य समजलं.                    

ऎशीच्या दशकात सुरूवातीला पंजाबविद्यापीठात चार-पाच टाळकी खलिस्थानबद्दल बोलताना आढळायची, कालांतरांने ती दहा-वीस, नंतर पन्नास-साठ अशी संख्या वाढत गेली. सुरवातीलाच तिकडे लक्ष न दिल्याने पुढे देशाला त्याची काय किंमत द्यावी लागली त्याचा इतिहास ताजाच आहे. हा असा भ्रम निर्माण करून देशाच्या शहरी भागातही नक्षलवाद पोसण्याचं हे कारस्तान आहे. माओवादी आणि काश्मीरी अतिरेकी यांची हातमिळवणी झाल्याची ही फळं आहेत. जिथे जी चालतील ती अस्त्र वापरायची दिल्लीत वैचारीक भ्रम तयार करायचा आणि केरळ, प. बंगालमध्ये मुडदे पाडायचे.         

एकूण काय ‘खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट’ शिवरायांनासुद्धा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वधच करावा लागला होता. प्रसंग बाका होता आणि............. आताही आहे.     


नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई        


Related Posts Plugin for WordPress, Blogger...