Tuesday, January 20, 2015

पुर्वांचल: फिरायलाच हवा

संगत्सर लेक 
सन २००४ ची गोष्ट. लोकसत्ता मध्ये ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख वाचल्यापासून मला पुर्वांचलाला जायची ओढ लागून राहिली होती. तवांग आपल्या देशाच्या पुर्वोत्तर सीमेला लागून असलेला भाग. अरुणाचल प्रदेश मधलं हे ठिकाण पुर्वांचलाचं प्रवेशव्दार समजल्या जाणार्‍या गुवाहाटीपासूनही शेकडो कि.मी. दूर आहे. तिकडे जायचं असं मनाने नक्की केलं असलं तरी तेव्हा ते एवढं सोप नव्हतं. असं असलं तरी जिथे जायचं तिथली माहिती गोळा करावी म्हणून मी त्या कामाला लागलो. त्या वेळी आत्ता एवढं माहितीचं महाजाल सक्षम नव्हतं आणि पर्यटन महामंडळाकडची माहिती अद्यावत नव्हती. एवढ्यात युथ हॉस्टेलच्या एका छोट्याश्या बातमीने माझं लक्ष वेधलं. तवांगची आठ दिवसाची एक सहल युथ हॉस्टेल नेणार होतं, मी त्या सहलीसाठी नाव नोंदणी केली. मात्र पुर्ण पैसे भरायला गेलो तेव्हा निराश झालो कारण त्यानी ती सहल रद्द केली होती. माझ्याच देशात मला हवं तिथे जायचं असलं तर आणखी कोण कशाला हवं असा विचार मनात आला आणि तवांगलाही स्वत:च जायचं असं ठरवून टाकलं. माझ्या बरोबर माझी पत्नी आणि मुलगीही यायला तयार झाली.  

तळ्यांचं तवांग
पुर्वांचल गाठायचंच अस मनात नक्की केलं तरी सहलीची रुपरेषा ठरवतानाच अडचणी येवू लगल्या, तशातच गुवाहाटीला बॉम्बस्फोट झाले. तिकडे जायचा माझा बेत ऎकून सर्वच मित्रपरिवाराने मला त्या पासून परवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मी माहिती जमवत होतो. ती महिती जमवता जमवता तवांगला जाण्यासाठी Inner Line Permit (ILP) घ्यावं लागतं हे समजलं. आता हे ILP कसं मिळवायचं? अरुणाचल प्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरकडून ते मिळतं याची महिती मिळाली. हे कमिशनर कोलकाता, गुवाहाटी, तेजपूर या ठिकाणी असतात. मुंबईतल्या माणसाला ती कशी मिळायची? कोलकात्याला संपर्क साधून बघितला पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतरच ते मिळणार असं समजलं. इनर लाईन परमीट मिळाल्याशिवाय हॉटेल बुकिंग तरी कसं करणार? पुर्वांचलात फोन एकतर लागत नव्हते किंवा लागले तर ते चुकीच्या ठिकाणी लागत होते.  अनेक अडचणी समोर दिसत असतानाच मुंबईत सचिवालय जिमखान्यात पुर्वांचल मधल्या राज्यांचा हस्तकला मेळावा लागला. तिकडे गेलो. बहुतेक लोक गुवाहाटीचे होते. त्यांच्या जवळ तिथल्या परिस्थिती विषयी चौकशी केली. गुवाहाटीत झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले आम्हीसुद्धा मुंबईत यायला घाबरत होतो. मुंबईतही बॉम्बस्फोट झाले होतेच ना? एकूण काय भिती बळगली तर घराबाहेरच पडायला नको. त्या मेळाव्यात आलेले पुर्वांचलातील लोक आथित्यशील वाटले. त्यांनी आपले फोन नंबर, कार्ड दिली. गुवाहाटीत आल्यास मदत करायची तयारी दाखवली. माझा उत्साह वाढला.

ब्रॅन्ड ऍम्बॅसीडर  
पुर्वाचलात फोन लागत नव्हते पण एक फोन बरोबर लागला आणि माझं काम हलकं झालं. काझिरंगा नॅशनल पार्कच्या बोनानी लॉजचा फोन पटकन उचलला गेला आणि पलिकडून आश्वासक आवाज ऎकू आला. बोनानी लॉजचे व्यवस्थापक श्री. सैकिया बोलत होते. अगदी विनंम्रपणे त्यानी सर्व महिती दिली. त्या लॅजमधली खोली आरक्षित करण्यासाठी लागणारा डिमांड ड्राफ्ट बोकाखाट शाखेवर काढावा असं सांगितलं तसंच माझ्या अनेक शंकांना योग्य उत्तरं दिली. हे बोनानी लॉज आसम सरकारच्या पर्यटन खात्याचं आहे हे विशेष. या एका आधारामुळे मी आश्वस्त झालो. मुंबईहून तवांगला तीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून जायचं तर पुर्वांचलातील इतरही भाग पहायला हवा असं वाटत होतं. काझिरंगा बरोबरच गुवाहाटी, तेजपूर, शिलॉंग, चेरापुंजी अशी अनेक ठिकाणं साद घालू लागली. एवढं सगळं फिरायचं तर पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणार होते. एवढ्यालांब आपण जाणार तर ते फिरलच पाहिजे हेही लगोलग ठरवून टाकलं. सगळे नकाशे, फिरण्याची ठिकाणं, त्यांच्या मधलं अंतर, अवघड रस्ते असल्याने त्या वरून प्रवास करायला लागणारा वेळ या सर्वांचं गणीत करताना सहलीचा आनंद आणखी वाढत होता. आपल्याला कुठेही सहलीला जायचं असेल ना तर शक्य तेवढ्या लवकर त्या सहलीचं आयोजन करावं कारण सहल ठरल्यापासूनच त्या सहलीची खरी सुरूवात होत असते. काय पहावं, कसं पहावं, रस्ते कसे आहेत, रहाण्या-जेवण्याची काय व्यवस्था होईल हे नक्की करताना आपण नकळत त्या भागात जावून पोहोचतो आणि आपलं मन त्या प्रदेशाची एक आभासी सहल करायला लागतं. पुर्वांचलाचा अभ्यास करता करता मला त्याने खरंच वेड लावलं.
बोनानी लॉजचं आरक्षण पार पडलं तरी बाकी ठिकाणी राहण्याची काय व्यवस्था करायची ते ठरेना कारण एकच Inner Line Permit. काहीही करून जायचंच हे तर नक्की होतं. मग रेल्वे आरक्षणाची स्थिती पाहिली तेव्हा गितांजली एक्सप्रेसचं आरक्षण मिळणार नाही हे समजलं. कोलकत्याला जाण्यासाठी मग हावडा मेलचा वेळकाढू प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. कोलकात्या मध्ये दोन दिवस फिरावं, जमलंतर तिथेच अरुणाचल प्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरकडून Inner Line Permit मिळतं का पहावं. असा बेत होता. कोलकाता ते गुवाहाटीचं विमानाचं तिकीट काढलं आणि गुवाहाटी पर्यंतचं जाणं नक्की झालं. पुढे इनर लाईन परमीट मिळालं तर तवांगला जावं किंवा पर्यायी ठिकाणांचं स्थलदर्शन करावं असा विचार करून परतीच्या प्रवासाचंही आरक्षण केलं. (या सहली नंतर पुर्वांचलाच्या आणखी दोन सफरी माझे मित्र ईशा टूर्सचे संचालक श्री. आत्माराम परब यांच्या सोबत केल्या. ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी सर्व सेवा-सुविधा हात जोडून उभ्या होत्या. पर्यटन संस्था आणि आपण स्वत:च केलेल्या सहलीत फरक तर असायचाच)

कोलकात्याचा दोन दिवसांचा मुक्काम संपवून भल्या पहाटे नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ गाठला. इंडीयन एअरलाईंसचं विमान पाच तास उशिराने सुटणार होतं. इनर लाईन परमीटचं काम कोलकात्यात झालं नव्हतं. सकाळी लवकर गुवाहाटीत पोहोचून ते मिळवण्याचा माझा प्रयत्न आणखी पाच तासांनी  पुढे गेला. साधारण अकराच्या सुमारास गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपिनाथ बार्डोलोई आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. खरं तर इथून आम्हाला काझिरंगाला जायचं होतं. पण पुन्हा इनर लाईन परमीटचं काम समोर दिसत होतं आणि ते गुवाहाटीलाच करावं लागणार होतं. शहरात जाण्यासाठी टॅक्सी केली आणि रेसिडेंट कमिशनर अरुणाचल प्रदेश यांच्या पत्त्यावर गेलो पण तिथलं कार्यालय दुसरीकडे स्थलांतरीत झालं होतं. दोन तासांच्या शोधाशोधी नंतर एका निवासी इमारतीमध्ये त्याचा पत्ता लागला. मला कोलंबसची सारखी आठवण येत होती.

रेसिडेंट कमिशनर अरुणाचल प्रदेश असा फलक सुद्धा नसलेल्या त्या इमारतीत कार्यालय कुठलं तेच समजत नव्हतं. दोन बाया एका लिहिण्याच्या टेबलावर पाय वर घेवून खिडकी शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या जवळ चौकशी केली तेव्हा समजलं की मला हवं असलेलं कार्यालय तेच आहे. मी त्या कार्यालयामध्ये प्रवेश मिळवला आणि त्याना मी तिथे येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यांचे साहेब कार्यालयात नव्हते आणि ते परत कधी येणार याची त्याना काहिच माहिती नव्हती. थोडं खावून घ्यावं आणि पुन्हा प्रयत्न करावा म्हणून मी बाजाराकडे वळलो. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने त्या कार्यालयात गेलो तर साहेब नुकतेच आले होते. त्याना माझी फाईल आणि फॉर्म दाखवला. अरुणाचल मध्ये कशाकरीता जायचं आहे? असा त्यांच्या प्रश्न होता. तो माझ्या देशाचा भाग आहे आणि तो आम्हाला पहायचा आहे. माझ्या बरोबर माझी बायको आणि मुलगी आहे त्याना आत बोलावतो असं सांगून मी त्यानाही आत बोलावलं. साहेबाना माझं म्हणणं पटलं आणि त्यानी इनर लाईन परमीट देण्याच्या सुचना दिल्या. ते तयार होईपर्यंत बोलताना ते म्हणाले की पुढच्या चार दिवसात २५ खासदारांचा अरुणाचल प्रदेशचा दौरा आहे, तुम्ही हॉटेल बुकिंग केलं आहे का? अर्थातच माझं उत्तर नाही असं होतं. इनर लाईन परमीट मिळाल्याशिवाय मी आरक्षण करणार तरी कसं?

हाच रस्ता आपल्याला बोलावतो आहे. 
इनर लाईन परमीट मिळलं, आता लवकरात लवकर काझिरंगाला गेलं पाहिजे म्हणून मी घाईत होतो. दुपारचे तीन वाजून गेले होते. ज्या बाईनी इनर लाईन परमीट दिलं त्यांचं लक्ष माझ्या मुलीकडे गेलं. या एवढ्या छोट्या मुलीला घेवून तुम्ही आता काझिरंगाला जाणार का? असं म्हणत असताना त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. आता खुप उशीर झाला आहे तुम्ही उद्या जा असा त्यांचा सल्ला होता. आमच्यातला संवाद हिंदीतून होत होता. ठिक आहे आम्ही जावू असं म्हणत मी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. चौकशी केली तेव्हा आम्हाला आता पलटन बाजार इथे जावं लागणार होतं.

पलटन बाजारला गेलो आणि काझिरंगाला जाण्यासाठी चौकशी केली तेव्हा समजलं की तिकडे जाणारी सगळी वाहनं निघून गेली होती. आणि आता पुढचं वाहन दुसर्‍या दिवशी सकाळी निघणार होतं. आता संध्याकाळचे चार वाजत आले होते आणि दिवस अस्ताला जायच्या तयारीत होता. आम्ही मुंबईहून गुवाहाटीला म्हणजे पश्चिमेकडून पुर्वेला गेलो होतो त्यामुळे दिवस लवकर मावळणार होता. काही करून मला काझिरंगाला पोहोचायचंच होतं. मुंबईत नेहमी रात्रीचा प्रवास करणारे आपण हा प्रवास सहज करू असं वाटत होतं. थोडी फार चौकशी केल्यावर एक तरूण त्याची खाजगी गाडी घेवून यायला तयार झाला. अखेर आम्ही काझिरंगाकडे प्रयाण केलं. या सगळ्या गडबडीमुळे एवढा वेळ बाहेरच्या दुनियेकडे पाहायला वेळच मिळाला नव्हता. आता गाडीत बसल्या बसल्या बाहेर बघताना नाविन्याचा आभास व्हायला लागला. ब्रम्हपुत्रेचं पात्र संध्याकाळच्या प्रकाशात गडद होत चाललं होतं. एखाद्या समुद्रासारखं ते पात्र अफाट पसरलं होतं. पुढे दिसपूर मधली असम सरकारची कार्यालयं दिसायला लागली. हे दिसपूरच असमचं राजधानीचं शहर आहे. पुराणकाळातलं प्रागज्योतिषपूर. पुर्वी कधीतरी वाचलेले संदर्भ आठवायला लागले. पुढे उजव्या बाजूला कामाख्या देवस्थानाकडे जाणारी कमान दिसली. गोव्याला जे कामाक्षीचं मंदिर आहे त्याचं हे मुळ पीठ. आता दुतर्फा झाड झाडोरा वाढू लागला. तो नोहेंबर महिना होता. हवेत बराच गारवा होता. हिमालयाच्या पुर्वरांगांमधून आमचा प्रवास सुरू होता. संधीप्रकाशाला जास्त संधी न देता आता काळोखाचं साम्राज्य सुरू झालं. दाट जंगलातून वळणं घेत गाडी चालली होती. अभयारण्याचा भाग सुरू झाला आणि ‘जंगली हत्तीं पासून सावध रहा’ असे फलक दिसायला लागले. जंगली हत्ती रस्त्यावर आले की सगळी वाहतूक थांबवली जाते. रात्रीच्या वेळी या जंगलातून प्रवास करणं धोक्याच आहे म्हणूनच तर मघाशी रेसिडेंट कमिशनरच्या कार्यालयातील बाईंना आमची काळजी वाटली होती.

काझिरंगामधल्या नागमोड्या वाटा 
काझीरंगाच्या मुख्य गेट समोरून एक सफाईदार वळण घेवून गाडी पुढे गेली आणि थोड्याश्या उंचवट्यावरील बोनानी लॉज समोर थांबली. गुवाहाटीपासून १९० किलोमीटर एवढा प्रवास करून आम्ही मुक्कामाला पोहोचलो होतो.  दिवस असता तर बाहेरचा रम्य देखावा पाहाता आला असता. असो पुढचे बारा-तेरा दिवस तो न्याहाळणारच होत. रात्रीचे नऊ वाजत होते. स्वागत कक्षात व्यवस्थापक श्री. सैकिया आमच्या स्वागताला तयारच होते. अगदी हात जोडून त्यानी आमचं स्वागत केलं. आधी जेवून घ्या, नंतर बोलू असं म्हणून त्यानी आमची रवानगी डयनींग हॉल मध्ये केली. जेवणं झाल्यावर पुन्हा सैकियांशी बोलणं झालं. एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे त्यानी आमची विचारपूस केली. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या सफारीची सोय करून दिली आणि माझ्या पुढच्या प्रवासाबद्दलचे सर्व प्रश्न ऎकून घेतले व दुसर्‍या दिवशी सगळी सोय करून देतो निश्चिंत रहा असं आश्वासन दिलं. सैकियाना भेटल्याने माझा सगळा ताण हलका झाला. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ अशी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा त्यानी सार्थ ठरवली होती.

पुर्वांचलातील एक रम्य संध्याकाळ 


               

                          

4 comments:

  1. Hya pudhil bhaag kadhi taknar aahat??
    Chaan lihile aahe

    ReplyDelete
    Replies
    1. http://prabhunarendra.blogspot.in/2012/05/tawang.html किंवा http://prabhunarendra.blogspot.in या ठिकाणी पुर्वांचल आणि पर्यटन विषयक लेख आपण वाचू शकता.

      Delete
  2. http://prabhunarendra.blogspot.in/2012/05/tawang.html किंवा http://prabhunarendra.blogspot.in या ठिकाणी पुर्वांचल आणि पर्यटन विषयक लेख आपण वाचू शकता.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...